न्यायालयाच्या अंतर्गत यंत्रणेमार्फत करा तक्रारींचे निवारण – विकास सिंह
नवी दिल्ली
2018-01-13
व्हीएस न्यूज -
सर्वोच्च न्यायालयाच्या ४ न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या कारभाराविषयी केलेल्या भाष्यावर माजी अतिरिक्त महाधिवक्ता विकास सिंह यांनी चिंता व्यक्त केली आहे. न्यायालयाच्या अंतर्गत यंत्रणेमार्फत सर्वोच्च न्यायालयाच्या कारभाराविषयी असलेल्या तक्रारींचे निवारण करण्याची गरज असल्याचेही विकास सिंह म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाबाबत जी बाब समोर आली आहे ती अत्यंत गंभीर बाब आहे. कुठलाही राजकीय नेता न्यायालय प्रशासनाबाबत असलेल्या समस्यांवर योग्य तोडगा काढू शकणार नाही. याशिवाय परिस्थिती आणखी बिघडवण्याचा ते प्रयत्न करतील. राजकीय नेत्यांवर ही समस्या सोडवण्यासाठी अवलंबून न राहता न्यायालयाच्या अंतर्गत यंत्रणेमार्फत या समस्येचे निराकरण केले पाहिजे, असे मत विकास सिंह यांनी व्यक्त केले आहे. लोकशाहीचा महत्वाचा स्तंभ सर्वोच्च न्यायालय असून सर्वांनी त्याचे संरक्षण करायलाच हवे. पण पत्रकार परिषद घेऊन सर्वोच्च न्यायालयाबाबत भाष्य केल्याने सामान्य जनतेच्या मनात संशय निर्माण झाला. न्यायपालिकेसाठी हे हितकारक नाही, असेही सिंह पुढे म्हणाले.