व्हीएस न्यूज- – प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर २६ जानेवारी रोजी अतिरेकी हल्ल्याच्या शक्यता लक्षात घेऊन दिल्लीसह संपूर्ण देशात हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्लीतील जामा मशीद परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाल्यामुळे हा हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी २६ जानेवारीच्या हल्ल्याच्या कटात सहभाग असल्याच्या आरोपाखाली बिलाल अहमद कावा याला अटक केली होती. त्या पार्श्वभूमीवर हा इशारा महत्त्वाचा मानला जात आहे.
देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणा सुरक्षा विषयक आढावा घेत असतात. सुरक्षेशी संबंधित प्रत्येक विभाग आपापल्यापरीने गुप्तरीत्या माहिती काढत असतो. त्याचा आढावा सर्व यंत्रणांचे प्रमुख घेत असतात. या आढाव्यामधूनही अतिरेकी हल्ल्याची शक्यता पुढे आली आहे. त्यावरून जामा मशीद परिसरात तीन संशयित लपल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. हे संशयित दहशतवादी मोठय़ा घातपाताच्या तयारीत असून ते अफगाणिस्तानचे असल्याचेही गुप्तचर यंत्रणांनी स्पष्ट केले आहे. काश्मीरच्या पुलवामामधून त्यांना विविध प्रकारच्या सूचना दिल्या जात आहेत. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाला कोणतीही वाईट घटना घडू नये या दृष्टीने हा हाय अॅलर्ट देण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांसह इतर तपास यंत्रणाही या घटनेकडे विशेष लक्ष ठेवून आहेत.
प्रजासत्ताक दिनाला दिल्लीमध्ये राजपथावर मोठय़ा कार्यक्रमाचे आयोजन केलेले असते. यामध्ये भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे क्षेपणास्त्रे यांच्याबरोबर संचलन करतात. राष्ट्रपतींना तिन्ही सैन्यदलांकडून मानवंदना दिली जाते. या संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलक प्रस्तुत केली जाते. त्यामुळे दिल्लीत कोणतीही अघटित घटना घडू नये, या दृष्टीने हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.