व्हीएस न्यूज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना नागपूरमध्ये धक्का बसला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या गावातच राष्ट्रवादी पुरस्कृत महिला सरपंचपदी विराजमान होत आहे. नागपुरातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्यांना झटका मिळाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावात ग्रामपंचायत निवडणूक झाली. राष्ट्रवादीनं पुरस्कृत केलेल्या धनश्री टोमणे सरपंच झाल्या आहेत.
एकूण नऊ जागांपैकी पाच जागा भाजपनं जिंकल्या आहेत, तर चार जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसला विजेतेपद मिळाले. मात्र सरपंचपद भाजपच्या हातून निसटले आहे. काल १८ जिल्ह्यातील जवळपास ४ हजार ११९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासह सदस्यपदासाठी मतदान झाले. यातील साधारण ३८० ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.