व्हीएस न्यूज – औद्योगिक संस्था, उद्योग परिवार, खासगी बँका, स्वयंसेवी संस्था, माध्यमे यांनी खासगी व्यवसायाला सन्मान मिळेल अशी संस्कृती आणि वातावरण निर्माण करण्यास हातभार लावला पाहिजे. नोकरी मिळत नाही म्हणून स्वयंरोजगार करावा लागतो, अशी अगतिकता असू नये; तर नोकरीतल्या संधी भलेही सोडेन पण, मी स्वत: रोजगार निर्माता होईन. नोकरी मागणारा नाही, तर नोकरी देणारा होईन, असा निर्धार तरुणांनी करावा, असे आवाहन देशाचे राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद यांनी रविवारी केले.
उत्तन (जि. ठाणे) येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे आर्थिक जनतंत्र परिषद (इकॉनॉमिक डेमोक्रॅसी कॉन्क्लेव्ह)चे उद्घाटन करताना ते बोलत होते. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या नॉलेज एक्सलन्स सेंटर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमासाठी राष्ट्रपतींच्या पत्नी सविता, राज्यपाल डॉ. चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय अर्थ राज्य मंत्री शिवप्रताप शुक्ला, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे (डिक्की) अध्यक्ष मिलिंद कांबळे, नाबार्डचे अध्यक्ष हर्ष कुमार यांचीही उपस्थिती होती. राष्ट्रपती पुढे म्हणाले की, समाजातील काही वंचित आणि शोषित युवक रिफायनरी, रुग्णालय, हॉटेल्स अशा व्यवसायांमध्ये स्वत:ला सिद्ध करून यशस्वी होत आहेत. ‘डिक्की’सारखी संस्था त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास मदत करीत असल्याबद्धल राष्ट्रपतींनी संस्थेचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांचे कौतुक केले.
आर्थिक जनतंत्रात बँकांची भूमिकाही महत्वाची असून पंतप्रधान मोदी यांनी जनधन योजना आणल्यामुळे ३० कोटीहून अधिक लोकांनी बचत खाती उघडली, ज्यात ५० टक्के महिला आहेत. ‘डायरेक्ट बँक ट्रान्सफर’मुळे भ्रष्टाचाराला आळा बसला आणि अशा खात्यांमध्ये विविध लाभांचे पैसे थेट जमा होऊ लागले, असे सांगून राष्ट्रपती म्हणाले की, विशेषत: महिलांनी आता केवळ बचत करण्याची प्रवृत्ती सोडून गुंतवणूक करायला शिकले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मुलत: एक अतिशय विद्वान असे अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांच्याच सूचनेप्रमाणे भारतीय रिझव्र्ह बँकेची स्थापना झाली होती. तसेच त्याकाळी त्यांनी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम खात्याची टेंडर्स ही दुर्बल आणि वंचित घटकाला मिळाली पाहिजे अशी भूमिका घेतली होती, असेही राष्ट्रपती म्हणाले. ठाणे, पालघर, मुंबई हा भाग ऐतिहासिक काळापासून व्यापार उदिमासाठी प्रसिद्ध आहे. वडा पाव विक्रेत्यापासुन ते मोठमोठे उद्योगपती याठिकाणी सक्रीय आहेत. येथे असलेल्या अनेक संधींचा फायदा युवकांनी घ्यावा आणि आर्थिकदृष्टय़ा सक्षम व्हावे असे आवाहनही राष्ट्रपतींनी केले.