व्हीएस न्यूज - आधारच्या पडताळणीसाठी बोटांचे ठसे आणि बुबुळांप्रमाणे आता चेहरा ओळखण्याच्या पर्यायाचाही (फेस रेकग्निशन) समावेश करण्यात येणार असून १ जुलैपासून नवी सुविधा कार्यान्वित होणार असल्याचे युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (यूआयडीएआय) सोमवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.
वयोवृद्ध व्यक्तींमध्ये अनेकदा बोटांचे ठसे अस्पष्ट होतात वा बुबुळांच्या साह्य़ाने पडताळणी करणे शक्य होत नाही. अशा वेळी आधारची पडताळणी करण्यात अडचणी येतात. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काही दिवसांपूर्वीच आधारच्या पडताळणीसाठी ठसे आणि बुबुळांचा वापर पुरेसा नसल्याचे मत व्यक्त केले होते. केंद्र सरकारच्या धोरणानुसार आर्थिक व्यवहार करताना पॅन क्रमांकाच्या बरोबरीने आधार क्रमांक देणेही सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकासाठी आधारची पडताळणी गरजेची ठरते. चेहऱ्याचा पर्यायही उपलब्ध होत असल्याने लोकांसाठी अतिरिक्त सुविधा मिळणार आहे. गेल्याच आठवडय़ात यूआयडीएआयने १६ आकडी आभासी क्रमांकाचा पर्यायही उपलब्ध करून दिला होता. आधारसाठी दाखल केलेल्या माहितीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर प्राधिकरण कामाला लागल्याचे दिसून येत आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002