फेरीवाले राज ठाकरेंच्या बंगल्याबाहेरच बस्तान मांडणार?
मुंबई
2018-01-17
व्हिएसन्यूज - फेरीवाला धोरणानुसार हॉकर्स झोन तयार आले असून त्यापैकी एक हॉकर्स झोन हा राज ठाकरे यांच्या घरासमोर आणि घराच्या मागच्या बाजूला असणार आहे. त्यामुळे आता फेरीवाल्यांवरुन राज्यभरात आंदोलन छेडणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराबाहेरच आता फेरीवाले बसणार आहेत.
फेरीवाल्यांसाठी एम. बी. राऊत आणि केळुसकर मार्ग या दोन्ही रस्त्यांवर प्रत्येकी दहा अशा एकूण २० जागा प्रस्तावित करण्यात आली आहे. पण या रस्त्यांवर सध्या एकही फेरीवाला बसत नाही. तसेच या परिसरात शाळा असल्याने हॉकर्स झोन तयार करण्याचा नियमावलीचे उल्लंघन करण्यात आल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे यांच्या घराबाहेर मुंबई महापालिकेने मुद्दाम फेरीवाल्यांना जागा दिल्याचा आरोपही मनसेने केला आहे. मनसेने एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर फेरीवाल्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर काँग्रेस आणि मनसेत राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. त्यानंतर आता न्यायालयाच्या निर्णयानुसार हॉकर्स झोन तयार करण्यात आले आहेत.