व्हिएसन्यूज - आमची शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी,शेतमालाला हमीभाव अशी मागणी होती. पण शेतकऱ्यांसह विविध घटकांतील जनतेच्या तोंडाला सरकारने पाने पुसली आहेत. दोन समाजात मनुवादी वृत्तीच्या लोकांनी तेढ निर्माण केल्याने महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण झाली आहे. सध्या महाराष्ट्र अस्थिर,अस्वस्थ असून राज्यात तसेच देशात असहिष्णुता पसरली असल्याचा घणाघाती आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याला तुळजापूर येथे तुळजाभवानी मंदिरात जागरण गोंधळ घालून सुरुवात करण्यात आली. उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर यानंतर मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर झालेल्या सभेमध्ये पवार बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री नवाब मलिक, दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, आ. राणा जगजितसिंह पाटील, राजेश टोपे, जयदत्त क्षीरसागर,महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील आदी दिग्गज नेते या वेळी उपस्थित होते.
माजी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, साडेतीन वर्षांच्या कालावधीत मोठी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजप सरकारने कोणाचेच भले केले नाही. ३ लाख कोटीवरून ८ लाख कोटींवर राज्याच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर गेला. पण सर्वसामान्यांच्या हातात काहीच पडले नाही. बोंडअळीमुळे कापूस हातातून गेला आहे. त्याचे केवळ पंचनामे करण्यात आले आहेत. पण अनुदान अद्यापही देण्यात आले नाही. उलट पाऊस पडला असतानाही शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचे बिल भरण्यासाठी वीजपुरवठा तोडला जात आहे. ऊर्जामंत्री पैसे भरा नाहीतर वीज तोडण्याची दमबाजी करत आहेत. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे काम या शासनाने केले आहे. विदर्भाला अधिक योजना देण्यात येत आहेत. मराठवाड्यावर मात्र, अन्याय केला जात आहे. अंगणवाडी कर्मचारी, एसटी कर्मचारी, आदिवासी,विद्यार्थी, व्यापारी अशा सर्वांनाच वेठीस धरण्याचे काम सरकारने केले आहे.