व्हीएस न्यूज - आपल्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा आयसीसीने केली असून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा २०१७ मधील उत्कृष्ट वन डे क्रिकेटर म्हणून गौरव करण्यात आला.
‘आयसीसी वन डे क्रिकेटर ऑफ द इयर’चा पुरस्कार विराट कोहलीला जाहीर झाला. कोहलीने गेल्या वर्षभरात तब्बल ६ शतके ठोकली आहेत. त्याची सध्याची वन डेची सरासरी ५५.७४ ऐवढी आहे. ही कोणत्याही वन डे खेळाडूची सर्वोत्तम सरासरी आहे. दुसरीकडे टी-२०तील कामगिरीबद्दल टीम इंडियाचा फिरकीपटू यजुवेंद्र चहलला गौरवण्यात आले आहे.
आयसीसी टी-२० परफॉर्मन्स ऑफ द इयरचा पुरस्कार चहलला जाहीर झाला. गेल्या वर्षी बंगळुरुत झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात चहलने २५ धावा देत ६ विकेट्स घेतल्या होत्या. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला कसोटीतील सर्वोत्तम कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात येणार आहे. ‘आयसीसी टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर’चा पुरस्कार स्मिथला जाहीर झाला. पाकिस्तानच्या हसन अलीने उदयोन्मुख क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावला. हसन अलीने चॅम्पियन्स ट्रॉफीत १३ विकेट्स घेत, पाकिस्तानच्या विजयात मोठा वाटा उचलला होता. असोसिएट प्लेअर ऑफ द इयरचा मान अफगाणिस्तानच्या राशीद खानला मिळाला. तर चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरणारा पाकिस्तानी संघ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. त्यामुळेच फॅन्स मुमेंट ऑफ द इयरचा पुरस्कार पाकिस्तानी संघाला जाहीर झाला.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002