‘पद्मावत’ बघण्यात मुस्लिमांनी वेळ वाया घालवू नये – ओवेसी
वारंगल
2018-01-19
व्हीएस न्यूज – एमआयएम पक्षाचे नेते आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पद्मावत हा बकवास चित्रपट असून हा चित्रपट बघण्यात मुस्लिमांनी वेळ वाया घालवू नये, असे वक्तव्य केले आहे.
बुधवारी वारंगल येथे असदुद्दीन ओवेसी यांनी जाहीर सभा घेतली. ओवेसी यांनी या सभेत ‘पद्मावत’ चित्रपटाबाबत भाष्य केले. पद्मावतसारख्या चित्रपटावर मुस्लिम तरुणांनी वेळ आणि पैसे वाया घालवू नये. हा चित्रपटच बकवास आहे. या वाईट चित्रपटाच्या मागे धावू नका, असे आवाहन त्यांनी केले. तुम्हाला चित्रपट बघण्यासाठी अल्लाहने पृथ्वीवर पाठवलेले नाही. चांगले काम तुम्ही करावे आणि सदैव लक्षात राहिल असे काम तुम्ही केले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. पद्मावतसारख्या बकवास चित्रपटासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १२ सदस्यीय समिती नेमली आणि या समितीने काही कट्स सांगितले. या चित्रपटाला ऐतिहासिक आधारच नाही. हा चित्रपट काल्पनिक असून अशा चित्रपटाकडे सरकारने ऐवढे लक्ष द्यावे, हे दुर्दैवच आहे, असा चिमटा त्यांनी काढला. चित्रपटाचा प्रश्न आल्यावर मोदी समिती नेमतात. पण तिहेरी तलाकबाबत मोदींना मुस्लिम नेत्यांशी चर्चादेखील करावीशी वाटत नाही, असा आरोप त्यांनी केला.
मुस्लिमांनी पद्मावती राणीच्या पाठिशी उभे राहणाऱ्या राजपूतांकडून धडा घ्यावा. पद्मावतविरोधात राजपूत एकत्र आले आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध दर्शवला. मुस्लीम कधीही इस्लामिक कायद्यातील बदलांविरोधात एकत्र येऊन उभे राहत नाही, असे ओवेसींनी नमूद केले. प्रवीण तोगडिया हे मुस्लीमविरोधी आहेत. अशा व्यक्तीला काँग्रेस पाठिंबा कसा देऊ शकते असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.