पुण्यातील काही अतिहुशार माणसांमुळे मेट्रोला उशीर – नितीन गडकरी
नागपूर
2018-01-22
व्हीएस न्यूज – पुणे महानगरपालिकेने सात वर्षांपूर्वी सार्वजनिक वाहतुकीचे सक्षमीकरण करण्यासाठी मेट्रो प्रकल्पाला मान्यता दिली. दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून त्यासाठी मेट्रो प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प आराखडाही तयार करून घेण्यात आला. पुण्याला मेट्रो प्रकल्पाला मान्यता देणारी देशातील पहिली महापालिका असा मानही मिळाला. पण त्यानंतर मेट्रो प्रकल्प प्रत्येक टप्प्यावर रखडला.
तेथील मेट्रो प्रकल्पाला पुण्यातील अतिहुशार माणसांमुळे विलंब होत असल्याची टीका केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली. नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी यावेळी नागपूर आणि पुण्यातील मेट्रो प्रकल्पांची तुलना करताना पुण्यातील भाजप नेत्यांना टोला लगावला. खूपच सुंदर पद्धतीने मेट्रोचा आराखडा तयार करण्यात आला आहे. पण पुण्यातील काही अतिहुशार माणसांमुळे त्यावर बरीच चर्चा होते आणि मतभेद होतात. पुण्यातील मेट्रो प्रकल्प या सर्व कारणांमुळे रखडला आहे. याउलट आमच्या नागपूरात एकछत्री अंमल असल्याने सर्व कामे पटापट होत आहेत, असे गडकरी यांनी म्हटले.