व्हीएस न्यूज - एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी औरंगाबाद येथील आयोजित जाहीर सभेत बोलताना मुस्लिम द्वेषातून ट्रिपल तलाक हा कायदा तयार करण्यात आला असून मुस्लिमांचे या कायद्यामुळे शोषण होणार आहे आणि मुस्लिमांनी कायद्याविरोधात एकवटले पाहिजे. या कायद्याला आज जर विरोध केला नाही तर भविष्यात मुस्लिमांच्या शरियतवरही बंदी घातली जाऊ शकते,असे मत व्यक्त केले. त्याचबरोबर ट्रिपल तलाक हा चुकीचा असून जो कुणी आपल्या पत्नीला ट्रिपल तलाक देईल त्याला समाजातून बहिष्कृत करा, असे आवाहन ओवैसी यांनी समाजबांधवांना केले.
असदुद्दीन ओवेसी हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून औरंगाबादेत त्यांची पहिली जाहीर सभा पार पडली. आमदार इम्तियाज जलील, गफार कादरी यांच्यासह एमआयएम पक्षाचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
ओवेसी यावेळी बोलताना म्हणाले, की १४ टक्के मुस्लिम समाज आज देशात आहे. पण कधीच त्यांच्या प्रश्नांवर उपाययोजना केल्या जात नाहीत. पण सध्या एका चित्रपटाला विरोध केला तर राजपूत समाजसाठी कमिटी बनवली जाते. चित्रपटाचे नाव बदलले जाते. तीनशे कट पाडले जातात. तो समाज फक्त चार टक्के आहे आणि मुस्लिम समाज हा १४ टक्के असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
ट्रिपल तलाकच्या मुद्द्यावर देशात अनेक प्रश्न असताना सुद्धा चर्चा घडवून आणली. मीडिया ट्रायल घेतला गेला आणि ट्रिपल तलाक विरोधी पक्षपाती कायदा पास करून घेतला. फक्त मुस्लिम द्वेषातून हे सगळे सध्याचे सरकार करत आहे. मुस्लिमांनी याला एकत्र येऊन उत्तर दिले पाहिजे. पण आपल्यात काही सुधारणा मुस्लिमांनीही केल्या पाहिजेत. ट्रिपल तलाक देणे हे योग्य नसून जर कोणी ट्रिपल तलाक देत असेल तर त्या तलाक देणाऱ्याला समाजातून बहिष्कृत केले पाहिजे असेही ओवेसी यावेळी म्हणाले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002