व्हीएसन्यूज– बहुतेक निवडणुकीच्या काळापुरतेच निवडणूक आयोगाचे अस्तित्व असे नागरिकांना जाणवत असते. पण सर्वसामान्यांना निवडणूक आयोगाचे अस्तित्व चांगलेच जाणवणार आहे. कारण नागरिकांना आता निवडणूक आयोगाबाबतची सर्व माहिती फेसबुक आणि युट्युब अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळणार आहे. निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांच्या हस्ते नुकतेच याबाबतच्या सोशल मीडिया कमिशन हबचे उद्घाटन करण्यात आले आहे.
निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि निवडणूक आयुक्त अशोक लवास हे सोशल मीडिया कम्युनिकेशन हबच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित होते. या हबचा उद्देश नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणे व आयोगाच्या उपक्रमाबाबत माहिती देणे असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या संवाद विभागाचे प्रमुख धिरेंद्र ओझा यांनी दिली. आजवर सोशल मीडियामध्ये निवडणूक आयोगाचे मर्यादित अस्तित्व जाणवले आहे. निवडणूक आयोगाने गतवर्षी ‘इंडिया व्होटस’ या पेजद्वारा विदेशातील नागरिकांमध्ये मतदान जागृती मोहीम राबविली. तसेच काही प्रशिक्षणाचे व्हिडिओ आयोगाने यु ट्युबमधून प्रसिद्ध केले होते.