व्हीएस न्यूज - सत्तेत राहून शिवसेना ही सरकारच्या विरोधात बोलत असली तरी सेना सरकारचा पाठिंबा काढणार नाही हे स्पष्ट असल्याने राज्यातील फडणवीस सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका नाही. वेळप्रसंगी शिवसेनेने पाठिंबा काढला तरी विविध पक्षांचे १५ ते २० आमदार संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, आपण काँग्रेससोबत होतो तेव्हा राज्यात व देशभरात सर्वत्र काँग्रेसची सत्ता येत होती. आज भाजपसोबत असल्याने देशातील १३ ते १५ टक्के दलित समाजाची मते भाजपला मिळाली आहेत. किंबहुना राज्यात त्या पाठोपाठ उत्तरप्रदेश व देशात इतरत्रही भाजपचे सरकार आले असून हिमाचल प्रदेश व गुजरातमध्येही भाजप सत्तेत येईल, असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला.
धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाचे औचित्य साधून आठवले चंद्रपुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेनेची सरकारविरोधातील नकारात्मक भूमिका योग्य नाही. आपण उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन यासंदर्भात भूमिका मांडणार आहे. मात्र सेनेच्या नकारात्मक भूमिकेमुळे सरकारला धोका नाही. दसरा मेळाव्यात उध्वर ठाकरे यांनी तसे स्पष्टही केले आहे. त्यामुळे फडणवीस पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप या प्रमुख पक्षांच्या आमदारांनाच निवडणूक नको आहे. त्यामुळे सरकार कायम राहील, असेही ते म्हणाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे बुलेट ट्रेनला कितीही विरोध करीत असले तरी बुलेट ट्रेन येणारच आणि आम्ही हा प्रकल्प मार्गी लावणारच, असेही आठवले म्हणाले. जगात विकासाची कास धरायची असेल तर बुलेट ट्रेन आवश्यक आहे. आज अहमदाबाद-मुंबई मार्गावर ही ट्रेन होत असली तरी भविष्यात इतर अनेक मार्गावर बुलेट ट्रेन धावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रिपब्लिकन ऐक्यासाठी तयार….
रिपब्लिकन ऐक्यासाठी आपण सदैव तैयार आहोत. आपण भाजपसोबत गेल्याने रिपब्लिकन ऐक्य होत नाही असे सांगितले जात असले तरी ते खोटे आहे. रिपाइंच्या ऐक्यासाठी सर्वप्रथम अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी समोर येणे गरजेचे आहे. रिपाइंच्या सर्व गटाने ऐकत्र यावे, त्यात बहुजन समाज पक्षालाही सोबत घ्यावे. ऐक्य झाल्यानंतर त्याचे अध्यक्षपद मायावती किंवा प्रकाश आंबेडकर यांना देण्यात यावे, आपण एक साधा कार्यकर्ता म्हणून ऐक्यात काम करायला तयार आहोत, असेही आठवले म्हणाले. माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांना भाजपात स्थान नाही. त्यामुळेच त्यांनी नरेंद्र मोदी सरकारवर बेछुट आरोप करण्यास सुरुवात केलेली आहे. त्यांच्या महात्त्वाकांक्षेला स्थान मिळत नसल्यामुळे नैराश्यातून अशा प्रकारे आरोप हे दोघे करीत असले तरी त्याचा कुठलाही परिणाम सरकारवर किंवा जनतेवर होणार नाही, असेही आठवले म्हणाले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002