व्हीएस न्यूज - महात्मा गांधीजी गोळी लागल्यावर ‘हे राम’ म्हटले नसल्याचा दावा गांधीजींचे तत्कालीन वैयक्तिक सचिव वेंकिता कल्याणम यांनी केला आहे. १९४३ ते १९४८ या काळात वेंकिता कल्याणम (वय ९६) हे गांधीजींचे वैयक्तिक सचिव होते.
कल्याणम यांनी २००६ मध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली होती. नथुराम गोडसेने गोळी मारल्यावर गांधींजींनी ‘हे राम’ असे म्हटले नसल्याचे कल्याणम म्हणाले होते. कल्याणम यांचे हे विधान चुकीचे असल्याचे महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी तेव्हाच म्हटले होते. पण आपल्या विधानाबाबत बोलताना कल्याणम म्हणाले की, माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला आहे. गांधींजींनी गोळी लागल्यानंतर ‘हे राम’ म्हटल्याचे मी ऐकले नाही, असे मी म्हणालो होतो. मला गांधीजींना गोळी लागल्यानंतर निर्माण झालेल्या गोंधळात काही ऐकू आले नाही. कदाचित ते ‘हे राम’ म्हटले असतील. गांधीजींना गोडसेने एकदाच मारले, पण राजकीय पक्ष त्यांच्या शिकवणीचा अवलंब न करून त्यांना रोज मारत आहेत, अशी टीकाही कल्याणम यांनी केली.