व्हीएस न्यूज – भाजप नेते एकनाथ खडसे यांनी ‘सामना’च्या अग्रलेखातून टीका करणाऱ्या शिवसेनेला प्रत्युत्तर दिले असून सत्तेतून बाहेर पडण्याची हिंमत शिवसेनेत नाही. आधी सत्तेतून त्यांनी बाहेर पडावे आणि मग भाजपच्या लोकांवर टीका करावी, अशा शब्दात त्यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे.
एकनाथ खडसेंवर बुधवारी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून विखारी टीका करण्यात आली होती. काँग्रेस- राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे यांना खुली ऑफर आहे. पण अशी ऑफर पदर ढळल्यावर येणारच. याच जन्मात या जन्मातली कर्माची फळ फेडायची असतात, अशा शब्दात शिवसेनेने एकनाथ खडसेंवर निशाणा साधला होता. आता शिवसेनेवर एकनाथ खडसेंनीही पलटवार केला आहे. शिवसेनेच्या टीकेची दखल घ्यावीशी वाटत नाही. शिवसेनेने आधी सत्तेतून बाहेर पडावे, मग आमच्यावर टीका करावी, असे त्यांनी म्हटले आहे. सत्ता सोडण्याची शिवसेनेची हिंमत नसून ते सत्तेत राहुनच भाजपवर टीका करत राहतील, असे सांगत त्यांनी शिवसेनेला चिमटा काढला.