व्हीएस न्यूज - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा अभूतपूर्व आणि ऐतिहासिक असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ‘सबका साथ-सबका विकास’ ही संकल्पना या अर्थसंकल्पामुळे आणखी विस्तारित झाली आहे. नवभारताच्या निर्मितीचा संकल्प सर्वसमावेशक असलेल्या या अर्थसंकल्पातून करण्यात आला असून त्यातून शेतकरी, गरीब, महिला,युवक, मागासवर्गीय आणि ज्येष्ठ नागरिक अशा विविध घटकांना न्याय देण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, सुमारे दोन दशकांची किमान आधारभूत किंमतीसंदर्भातील (एमएसपी) शेतकऱ्यांची मागणी आज पूर्ण झाल्याने हा एक ऐतिहासिक क्षण असल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनखर्चाच्या दीडपट एमएसपी प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी जास्तीच्या बाजारपेठा उपलब्ध करण्यासह शेतीक्षेत्रात पायाभूत सुविधा निर्मिती, अन्नप्रक्रिया उद्योग आणि फलोत्पादनास चालना देण्यासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. सिंचन प्रकल्पांसाठी राज्य सरकारने नाबार्डच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीचीही पूर्तता करण्यात आल्याचा आम्हाला अतिशय आनंद आहे. त्यासाठी मी मोदी, जेटली आणि नितीन गडकरी यांचा अतिशय आभारी आहे.
मुंबईच्या लोकल रेल्वे वाहतुकीला अधिक भक्कम करण्यासाठी ४० हजार कोटींची भरीव तरतूद ही मुंबईसह अवघ्या महाराष्ट्रासाठी आनंददायी असून इतका मोठा निधी आजवर कधीही मुंबईला प्राप्त झालेला नव्हता. १० कोटी लोकांना मुद्रा योजनेच्या माध्यमातून रोजगार देण्याचा प्रयत्न झाला आहे. यात ७ कोटी महिला आणि ५ कोटी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आहेत. त्यात आणखी ३ कोटी अतिरिक्त रोजगारनिर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002