व्हीएस न्यूज – एकनाथ खडसे यांनी राहुल गांधी यांची भेट घेतल्याचे वृत्त शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ने दिले असून आहे. काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय खडसेंनी घेतला असून त्यांनी सून रक्षा खडसेंसह राहुल गांधी यांची भेट घेतली. या प्रसंगी काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण देखील उपस्थित होते, असा दावा वृत्तात करण्यात आला आहे.
एकनाथ खडसे राज्यात दोन लोकसभा मतदारसंघांमधील पोटनिवडणुकीच्या अगोदरच वाजतगाजत काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा दावाही वृत्तात करण्यात आला. एकनाथ खडसे २९ जानेवारीला दिल्लीला रवाना झाले. विमानात त्यांच्यासोबत पृथ्वीराज चव्हाण हे देखील होते. रक्षा खडसे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी खडसे कुटुंबीय मुक्कामी होते. खडसेंनी ‘सामना’च्या वृत्ताबाबत बोलताना हे वृत्त फेटाळले आहे. विमानतळावर पृथ्वीराज चव्हाण, मोहन प्रकाश या दोघांची योगायोगाने भेट झाली, असे त्यांनी सांगितले.