व्हीएस न्यूज - शिवसेनेने केंद्र सरकारचा केंद्रीय अर्थ संकल्पावरून समाचार घेतला असून जुनीच स्वप्ने आणि जुन्या घोषणा अरुण जेटली यांच्या अर्थसंकल्पात असल्याची टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
अर्थव्यवस्थेची कासवछाप अगरबत्ती मोदी सरकारच्या एककल्ली आणि आततायी धोरणामुळेच झाल्याची टीका करतानाच केंद्र सरकारने अर्थसंकल्पातून पुन्हा एकदा स्वप्नांचाच भुलभुलैय्या देशातील जनतेसमोर ठेवला असल्याची टीका शिवसेनेने केली आहे. ग्रामीण भागातील जनता दुरावत असल्याचे गुजरात निवडणुकीतून सरकारच्या लक्षात आल्याने यंदाच्या अर्थसंकल्पात ग्रामीण भागावर भर देण्यात आला असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.
शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नावरही शिवसेनेने लक्ष वेधले आहे. काँग्रेस सरकारच्या काळात राज्यात १० वर्षांत जेवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यापेक्षा जास्त आत्महत्या गेल्या साडेतीन वर्षांत झाल्या आहे. अर्थसंकल्पातील तरतुदीचे आकडे सरकारने मिरवावेत, पण शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल हा अर्थसंकल्प काहीच सांगत नाही, असे म्हटले आहे. ‘महागाई’ या शब्दाचा उल्लेखही अर्थसंकल्प मांडताना केला नाही. काँग्रेसचे सरकार तीन वर्षांपूर्वी महागाईच्या आगीत जमीनदोस्त झाले. देशातील जनता नवे सरकार महागाई आटोक्यात आणेल आणि आपले जीवन सुसह्य होईल अशी भाबडी आशा बाळगून होती, पण जनतेच्या नशिबाचे भोग मागच्या पानावरून पुढे सुरूच राहिल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. तसेच केंद्रीय अर्थसंकल्पाचे एका वाक्यात विश्लेषण करायचे म्हणजे विंदा करंदीकरांच्या कवितेप्रमाणे ‘तेच ते नि तेच ते..!’ असा हा अर्थसंकल्प असल्याचा चिमटा सेनेने सरकारला काढला आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002