श्याम बेनेगल यांना यंदाचा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर
मुंबई
2018-02-05
व्हिएसन्यूज - यंदाचा व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक श्याम बेनेगल यांना जाहीर झाला आहे. मुंबई आंतराष्ट्रीय फिल्म महोत्सव-२०१८ च्या सांगता सोहळ्यात हा पुरस्कार त्यांना राज्यपाल सी.विद्यासागरराव यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल.
एक स्वतंत्र समिती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती. यात किरण शांताराम, राहुल रावल, प्रसून जोशी, भारती प्रधान आणि विनोद अनुपम यांचा सहभाग होता. श्याम बेनेगल यांच्या भारतीय सिनेसृष्टीतील कार्याची समितीने दखल घेऊन, त्यांना हा पुरस्कार जाहीर केला.
आपल्या कारकीर्दीत श्याम बेनेगल यांनी २८ चित्रपटांचे दिग्दर्शन केले. यात अंकुर, निशांत, मंडी, भूमिका, मंथन आणि जुनूनसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय, त्यांनी ४१ माहितीपटांचीही निर्मिती केली. बेनेगल यांना त्यांच्या ‘अरोहन’ (१९८२) या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. २००५ मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. त्याशिवाय, त्यांना पद्मभूषण पुरस्कारानेही त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.