शरद पवारांनीच एकबोटेला ‘मोक्का’पासून वाचवले - प्रकाश आंबेडकर
मुंबई
2018-02-05
व्हीएस न्यूज - २००१ मध्ये पुणे जिल्ह्यातील सासवड येथील हिंदू- मुस्लिम दंगलीसंदर्भात कोरेगाव भीमा हिंसाचाराचा सूत्रधार मिलिंद एकबोटे याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) लावण्याची पुणे पोलिसांनी शिफारस केली होती. पण तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांना तशी कारवाई न करण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केला.
त्यांनी पुणे पोलिसांना त्यावेळची नोटही पत्रकारांना सादर करत एकबोटेवर तेव्हाच कारवाई झाली असती तर कोरेगावात हिंसाचार घडलाच नसता, असा दावाही केला. ‘मुँह मे राम, बगल मे छुरी’ असे शरद पवार यांचे आजपर्यंतचे वर्तन राहिले असल्याचे आंबेडकर म्हणाले. भाजपशी संबंधित एकबोटे होते, तरी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठीशी घातल्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग असेल अशा कोणत्याही राजकीय आघाडीत भारिप बहुजन महासंघ सामील होणार नाही. त्यामुळेच आपण २६ जानेवारी रोजी निघालेल्या संविधान बचाओ रॅलीत सहभागी नव्हतो, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.