पात्रता नसलेली व्यक्ती राजकारणात कधी पुढे येईल याचा नेम नाही - खडसे
जळगाव
2018-02-05
व्हीएस न्यूज - पंतप्रधान होण्याची क्षमता लेवा पाटीदार- पटेल समाजात असून ती लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्यात होती, इतिहासाचा धांडोळा घेतल्यावर हे सहज लक्षात येते. पण पात्र माणसाला राजकारणात केव्हा बाजूला सारले जाईल अन् पात्रता नसलेली व्यक्ती पुढे येईल याचा काही नेम नाही. जशी निर्माण करण्याची धमक आपल्यात आहे तसेच ते भस्मसात करण्याचीही असल्याचा गर्भित इशारा भाजपचे नाराज नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी स्वपक्षीयांना दिला.
एकनाथ खडसे यावल तालुक्यातील पाडळसे येथे लेवा पाटीदार समाजाच्या चौथ्या राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते. या समाजाचे तीन आमदार, पाच माजी आमदार, एक खासदार, दाेन माजी खासदार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यासपीठावर उपस्थित हाेते. शंखनाद करून पाच युवतींच्या हस्ते दीपप्रज्वलनाने ३३ वर्षांनंतर हाेणाऱ्या या महाअधिवेशनाचे उद्घाटन झाले. यावेळी सलग ५२ वर्षे समाजाचे कुटुंबनायक पदाची जबाबदारी सांभाळणारे रमेश विठू पाटील यांचा सपत्नीक गाैरव करण्यात आला.