व्हीएस न्यूज - आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीमध्येही कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असेल्या भारतीय संघाने अव्वलस्थानी झेप घेतली आहे. सोमवारी आयसीसीने क्रमवारी प्रसिद्ध केली. भारताने त्यामध्ये द. आफ्रिकेकडून अव्वलस्थान काबीज केले. भारतीय संघ १२० गुणासह एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाची घसरण होऊन दुसऱ्या स्थानावर ढकलला गेला आहे. भारतीय संघ सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत अपयशी ठरल्यानंतर एकदिवसीय मालिकेमध्ये सलग दोन सामन्यामध्ये भारताने विजय मिळवला. भारतीय संघाला याचाच फायदा आयसीसीच्या क्रमवारीत झाला. पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेला एका गुणाचा फटका बसला आहे. आता अव्वलस्थान कायम राखण्यासाठी भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका ४-२ अशा फरकाने जिंकावी लागणार आहे.