व्हीएस न्यूज -अज्ञात मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना 1 फेब्रुवारी रोजी यमुनानगर येथील व्दारका स्वीट समोर रात्री आठ वाजता घडली होती.
श्रवण परमार हरीजन (वय-18, रा. ज्योतीबानगर, तळवडे, मुळ. चितोड, गुजरात) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा मित्र अशोक ठाकुर (वय-20) याने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 फेब्रुवारी रोजी श्रवण हा रात्री आठच्या सुमारास यमुनानगर येथील व्दारका स्वीट समोरून दुचाकीवरून जात होता. भरधाव वेगाने आलेल्या मोटारीने त्याच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या श्रवणला उपचारासाठी खासगी रूग्णालय़ात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान श्रवणचा सोमवारी मृत्यू झाला. तर आरोपी मोटार चालकाने घटनास्थळी न थांबता पोबारा केला. फौजदार सुर्यवंशी अधिक तपास करत आहेत.