व्हीएस न्यूज - - संपादित जमिनीचा योग्य मोबदला मिळाला नाही म्हणून विषप्राशन करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचा मृत्यू झाला तेव्हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत आकांडतांडव करणा-या शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत मात्र मूग गिळून बसणे पसंत केले. या प्रकरणाचा मुख्य सचिवांकडून संपूर्ण अहवाल येणे अपेक्षित होते. मात्र त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही.
धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विषप्राशन केल्यानंतर त्यांचा जे. जे. रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच लक्ष केले होते. ‘धर्मा पाटील प्रकरणावर मुख्यमंत्री का बोलत नाहीत’ असा सवाल रावते यांनी केला होता. त्यावेळी एक आठवडय़ात याबाबतचा अहवाल सादर करावा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांना दिले होते. या घटनेची गंभीर दखल घेत आलेल्या माहितीवर कृती आराखडा तयार करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते.
सरकारने आदेश देऊन आठवडा उलटून गेला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर चर्चा अपेक्षित होती. मात्र मंगळवारच्या बैठकीत कोणताही अहवाल आला नाही. गेल्या वेळी शेतकरी आणि धर्मा पाटील प्रकरणाबाबत मोठा कळवळा असल्याचा आव आणणा-या शिवसेनेच्या मंत्र्यांनी या बैठकीत तोंडही उघडले नाही. याबाबत शिसेनेचे मंत्री रामदास कदम यांना विचारले असता, आज मंत्रिमंडळात खूप विषय असल्याने त्यावर चर्चा झाली नसल्याचे सांगून त्यांनी काढता पाय घेतला.
काय आहे प्रकरण?
धुळे जिल्ह्यात होणा-या औष्णिक वीज प्रकल्पात त्यांची पाच एकर जमीन संपादीत करण्यात आली होती. मात्र पाच एकराच्या बदल्यात त्यांना केवळ चार लाख रुपये भरपाई देण्यात आली. धर्मा पाटील यांच्या चार एकर जमिनीत आंब्याची ६०० झाडे होती. विहीर, ठिबक सिंचन आणि वीज अशी बागायती शेती असलेल्या धर्मा पाटील यांना केवळ ४ लाखांचा मोबदला देण्यात आला. इतर शेतक-यांच्या तुलनेत भरपाई कमी मिळाल्याबाबत धर्मा पाटील यांनी गेल्या तीन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू केला. मात्र त्यांना अधिकारी आणि संबंधित मंत्रालयाकडून योग्य उत्तरे मिळत नसल्याने त्यांनी विषप्राशन केले. पाटलांच्या विषप्राशनानंतर जाग आलेल्या सरकारने पाटील यांच्या कुटुंबियांना १५ लाखाचे सानाुग्रह अनुदान देऊ केले. मात्र अनुदान नको, आम्हाला मोबदला द्या, अशी मागणी लावून पाटील कुटुंबाने धरली आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002