व्हीएस न्यूज - राजस्थानमधील पोटनिवडणुकीत मिळालेल्या पराभवानंतर मुख्यमंत्री वसुंधरा राजेंविरोधातील भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी आता समोर येऊ लागली आहे. कोटा जिल्ह्याचे ओबीसी विंगचे प्रमुख अशोक चौधरी यांनी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना पत्र लिहून मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना हटवण्याची मागणी केली आहे. वसुंधरा राजे यांच्या कार्यशैलीवर राज्यातील जनता खूश नाही, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी पक्षाचे प्रदेश प्रमुख अशोक परनामी यांनाही पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.
अशोक चौधरी म्हणाले की, सध्या भाजपा कार्यकर्त्यांमध्ये असंतोष दिसतोय. मी राजस्थान भाजपा कार्यकर्त्यांचे म्हणणे माझ्या पत्रात मांडले आहे. पत्रातील प्रत्येक शब्द पक्ष कार्यकर्त्यांची हतबलता व्यक्त करतो, असेही ते म्हणाले. पत्र लिहिण्या मागचे कारण त्यांना विचारले असता ते म्हणाले, कार्यकर्त्यांच्या नाराजी नंतर मला वाईट वाटले. त्यामुळे असे पत्र लिहिण्यास मला नाईलाज झाला. राजस्थानमधील तीन जागांवर भाजपाला अपयश आल्यानंतर म्हणजे एक फेब्रुवारीनंतर हे पत्र लिहिण्यात आले होते. राज्यातील जनता वसुंधरा राजेंच्या कार्यपद्धतीवर खूश नाहीत. त्यांच्या काम करण्याच्या या शैलीमुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास ढासळत आहे. त्याचा पक्ष संघटनेला फटका बसत आहे,असे म्हणत वसुंधरा राजे पक्षाला अशा मार्गावर नेत आहेत, जिथे पक्षाचा पराभव निश्चित आहे, असा दावाही त्यांनी केला. आगामी निवडणुकांपूर्वी पक्षात चैतन्य आणायचे असेल तर राज्याच्या नेतृत्वात बदल करण्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002