व्हीएस न्यूज – मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन खाली पडल्यांनंतर त्रिमूर्ती आवारातून पडलेल्या हर्षल रावतेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सेंट जॉर्ज रुग्णालयात त्या तरुणाला नेण्यात आले. पण डोक्याला जबर मुका मार बसलेल्या हर्षलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या खिशात पोलिसांना सुसाईड नोट मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ह्या घटनेची माहिती मिळताच मंत्रालयात येऊन घटनेची माहिती घेतली. पाटील यांनी यावेळी मंत्रालय सुसाईड पॉईंट झाला आहे का ? महिनाभरात आत्महत्येच्या प्रयत्नाची ही तिसरी घटना आहे. नेमकी ही घटना का घडली, याचा खुलासा सरकारने करावा, अशी मागणी केली. तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंत्रालयाकडे जनता न्याय मिळेल या आशेने पाहत असते, पण जनतेला न्याय मिळत नाही. अशा घटना वारंवार घडणे हे सरकारसाठी भूषणावह नाही, या शब्दात सरकारवर टीका केली.
शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनीही मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न झाल्याची घटना कळताच घटनास्थळाला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. मंत्रालयात वारंवार आत्महत्येच्या प्रयत्नांच्या घटना घडत आहेत, याचा अर्थ जनता त्रस्त आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.
तावडे यांनी या घटनेबाबत अधिक माहिती देताना स्पष्ट केले की, पैठण तुरुंगात हर्षल रावते हा खुनाच्या गुन्ह्याची शिक्षा भोगत होता. तो तुरुंगातून पॅरोलवर बाहेर आला होता. त्याने २००३ साली त्याच्या मेव्हणीची हत्या केली होती. तो २०१४ पासून पैठण तुरुंगात शिक्षा भोगत होता. तसेच त्याने आत्महत्या केली की हा अपघात आहे, याचा तपास पोलीस करत असल्याचेही तावडे यांनी सांगितले होते.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002