व्हीएस न्यूज - शिवसेनेचे दलाल नाणार प्रकल्पाजवळील जमीन खरेदी करण्यासाठी फिरत असून येथील जनतेला या प्रकल्पाबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उल्लू बनवत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राजापूरमधील कात्रादेवी येथील सभेत बोलताना केला.
राणे म्हणाले, की नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध असल्याचे सिद्ध करुन दाखवा, राजकीय जीवनातून मी निवृत्त होईल, असे म्हणत त्यांनी शिवसेनेला खुले आव्हान दिले आहे. मोदी-अमित शहा यांनी हा प्रकल्प आणला, असे खासदार विनायक राऊत सांगतात. पण नाणार कुठे आहे, हे त्या दोघांना माहीत तरी आहे का ? विधिमंडळात मुख्यमंत्र्यांनी सांगितले, आंध्रमध्ये हा प्रकल्प जात होता, तो याच विनायक राऊत यांनी राजापुरात आणला. शिवसेनेला कोकणाने २४ आमदार दिले. पण कोकणाला शिवसेनेने काय दिले? शिवसेना नारायण राणे यांना घाबरते. हिंमत असेल तर सत्तेतून बाहेर पडा असेही नारायण राणे यावेळी म्हणाले.
प्रकल्पाला रामदास कदम यांचा विरोध आहे, तर मग प्रकल्पाला पर्यावरणाचा दाखला कोणी दिला, असा सवालही त्यांनी केला. थापा मारण्याचे काम उद्योगमंत्री सुभाष देसाई करत आहेत, तर या प्रकल्पावरुन जनतेला उद्धव ठाकरे उल्लू बनवण्याचे काम करत आहेत. १५ दिवसात प्रकल्प रद्द करण्याची भाषा शिवसेनेने केली होती. त्याचे काय झाले असा सवालदेखील राणेंनी यावेळी केला. न्याय मिळेपर्यंत नाणारच्या जनतेसोबत असेन, तुम्ही अशीच एकजूट दाखवा. माझा प्रकल्पाला शंभर टक्के विरोधच असणार असल्याची घोषणा यावेळी नारायण राणेंनी केली.
हा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, असे सांगत यासाठी आंदोलनाचे नेतृत्व आपण स्वतः करणार असल्याची हमी त्यांनी प्रकल्पग्रस्तांना दिली. आपण सरकारकडे या रिफायनरी प्रकल्पाविरोधात दाद मागणार मागणार असून, या प्रकल्पाच्या विरोधातील सर्व मुद्दे घेवून आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचेही राणे यांनी यावेळी स्पष्ट केले. विशेष म्हणजे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या या जाहीर सभेला काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002