व्हीएस न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात लाेकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यासाठी आग्रही असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याचे आवाहन राज्य निवडणूक आयोगाला केले. तसेच लोकशाही सुदृढ करण्यासाठी व मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी किमान राज्याच्या कायद्यानुसार घेतल्या जाणाऱ्या निवडणुकांत तरी मतदानसक्ती करता येईल का, याबाबत विचार व्हावा, अशी सूचनाही त्यांनी केली. निवडणूक आयोगातर्फे आयोजित निवडणुका व सुप्रशासन या विषयावरील परिषदेत ते बोलत होते. मतदानासाठी होणारा पैशाचा वापर ही चिंतेची बाब आहे. पैशाचा हा गैरवापर थांबला पाहिजे,’ अशी अपेक्षाही फडणवीस यांनी व्यक्त केली.
अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, ब्राझील, इक्वेडोर, लिंचेस्टिन, लक्झेंबर्ग, उत्तर कोरिया आदी २२ देशांत मतदान सक्तीचे केले आहे. मतदानास गैरहजेरीचे योग्य कारण न दिल्यास त्यांना ३ महिने बँकेचे व्यवहार करता येत नाहीत. नवीन पासपोर्ट मिळत नाही, नूतनीकरणही होत नाही. २० ते २२ डॉलरचा दंडही ठोठावण्यात येतो. स्वातंत्र्यापासून आतापर्यंत भारतातील कोणत्याही राज्यामध्ये मतदानसक्ती नसल्यामुळे महाराष्ट्रापुरता तरी तसा निर्णय घेणे फडणवीस सरकार व आयोगाला अशक्य होईल.
राज्यात एकत्रपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्यास निवडणूक आयोग, प्रशासन आणि पोलिसांवरील ताण कमी होईल. तसेच वारंवार होणाऱ्या निवडणुकांसाठी होणाऱ्या खर्चातही मोठ्या प्रमाणावर बचत होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्याला निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करण्याचे अधिकार असून त्यानुसार निवडणूक आयुक्तांची समिती नेमावी. त्या माध्यमातून एकत्रित निवडणुकांबाबत अभ्यास करून अहवाल शासनाला सादर करावा, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002