रेल्वेच्या दांडीबहाद्दर १३ हजार कर्मचाऱ्यांची जाणार नोकरी
नवी दिल्ली
2018-02-10
व्हीएस न्यूज – दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांकडे भारतीय रेल्वे प्रशासनाने वक्रदृष्टी वळवली असून दीर्घ काळापासून जे कर्मचारी परवानगी न घेता अनुपस्थित आहेत अशांवर कारवाई करण्यात येणार आहे. कोणत्याही सूचनेशिवाय कामावर येत नसलेल्या १३, ५०० कर्मचाऱ्यांचा रेल्वेने शोध लावला असून रेल्वे प्रशासनाने अशा कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्याची कारवाईही सुरू केली आहे.
एका निवेदनाद्वारे रेल्वे प्रशासनाने ही माहिती दिली असून एक अभियान रेल्वेची कामगिरी चांगली होण्यासाठी व निष्ठावान आणि कष्टाळू कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढावे यासाठी सुरू केले आहे. त्याचाच भाग ही कारवाई असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. एक व्यापक अभियान रेल्वेतील विविध विभागात दीर्घ कालावधीपासून अनाधिकृतपणे अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना शोधण्यासाठी सुरू करण्यात आले. रेल्वेला या अभियानात १३ लाख कर्मचाऱ्यांमधून १३,५०० असे कर्मचारी आढळून आले, जे कोणतीही सूचना न देता दीर्घ कालावधीपासून अनुपस्थित आहेत. त्यामुळे रेल्वेने अशा अनुपस्थित कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यासाठी नियमानुसार अनुशासनात्मक कारवाई सुरू केली आहे.