व्हीएस न्यूज - देशातील सर्वात मोठा बँक दरोडा रोखणाऱ्या राजस्थानातील एका सामान्य कॉन्स्टेबलला आयपीएस अधिकाऱ्यांच्या संघटनेने सलाम केला आहे. तसेच पोलिस आयुक्तांनीही त्याच्यासाठी शौर्य पुरस्काराची शिफारस केली आहे. एक जयपूर येथील कॉन्स्टेबल सिताराम याने अॅक्सिस बँकेतील दरोडा रोखला होता. त्यावेळी बँकेत 925 कोटी रुपये होते. मात्र सिताराम याने फक्त एक गोळी झाडून दरोडेखोरांना पळवून लावले होते. त्याच्या या कृत्यामुळे तो सर्व पोलिस विभागात कौतुकाचा विषय ठरला आहे. देशातील आयपीएस अधिकार्यांची संघटना असलेल्या आयपीएस असोशिएशनने आपल्या ट्विटर हँडलवरून सिताराम याचे कौतुक केले आहे. तुम्ही केवळ मोठी रक्कमच वाचविले नाही तर तुम्ही हिरो बनला आहात आणि आम्हाला तुमचा अभिमान वाटतो, असे संघटनेने म्हटले आहे. आयपीएस अधिकाऱ्यांच्या संघटनेचे हे ट्विट राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांनीही रीट्वीट केले आणि कॉन्स्टेबल सितारामला शाबासकी दिली. जयपूरच्या ॲक्सिस बँकेत गेल्या शुक्रवारी ही दरोडेखोरीची घटना घडली होती. त्यावेळी इनोव्हा गाडीतून आलेल्या 13 बुरखाधारी लोकांनी बँक लुटण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी बँकेच्या सुरक्षा कर्मचाऱ्यावर बंदूक रोखली होती. सिताराम याने बँकेच्या आतून केवळ एक गोळी झाडल्यामुळे दरोडेखोरांना रिकाम्या हाती पळून जावे लागले होते.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002