व्हिएस न्यूज – गारपिटीचा तडाखा बसल्याने विदर्भासह मराठवाड्यातील अनेक भागांतील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने तातडीने नुकसानीचे पंचनामे करावेत,या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी मंगळवारी सकाळी नागपूर-अमरावती मार्गावर रास्ता रोको केला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: येऊन नुकसानीची पाहणी करावी अशी मागणी यावेळी शेतक-यांनी केली आहे. या आंदोलनात भाजपचे नाराज आमदार आशिष देशमुखही सहभागी झाले होते.
राज्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ११ जिल्ह्यातील सुमारे ५० तालुक्यांमधील १०८६ गावांमधील १ लाख २४ हजार २९४ हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. यामध्ये गहू, हरभरा, ज्वारी,कांदा आणि रब्बी हंगामामधील फळ पिकांना मोठा फटका बसला आहे. सर्वाधिक फटका बुलडाणा, अमरावती आणि जालना जिल्ह्याला बसला आहे. कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी याबाबत माहिती दिली. शनिवारी आणि रविवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे विदर्भ,मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही भागात शेतीचे आणि काढणी झालेल्या मालाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीबाबत पंचनामा करण्याचे आदेश सोमवारीच कृषीमंत्र्यांनी दिले होते. या बाधित जिल्ह्यांमध्ये कृषी अधिका-यांनी क्षेत्रिय पाहणी केली. महसूल प्रशासन आणि कृषी अधिकारी यांनी राज्य शासनाला नुकसानीबाबत प्राथमिक अहवाल सादर केला आहे. बाधित ११ जिल्ह्यांमध्ये बीड, जालना, परभणी, जळगाव, बुलढाणा, अमरावती,अकोला, वाशिम, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली यांचा समावेश आहे.
विदर्भात अमरावती, बुलडाण्याला फटका
तालुक्यातील २७० गावातील २६ हजार ५९८ हेक्टर क्षेत्रावरील संत्रा, हरभरा, गहू, कांदा, भाजीपाल्याचं नुकसान झालं आहे. अकोला जिल्ह्याती मुर्तीजापूर, बार्शी टाकळी,अकोला, अकोट, पातूर, बाळापूर आणि तेल्हार या सात तालुक्यातील १०१ गावांमधील ४ हजार ३६० हेक्टरवरील संत्रा, हरभरा, गहु, कांदा या पिकांचे नुकसान झालं आहे.
वाशिम जिल्ह्यातील रिसोड आणि मालेगाव तालुक्यातील ३६ गावांमधील ८ हजार ५०९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. अशा पद्धतीने एकूण १०८६ गावातील १ लाख २४ हजार २९४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, बाधित क्षेत्राच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. क्षेत्रिय स्तरावरुन पुढील दोन ते तीन दिवसात नुकसानीचा परिपूर्ण अहवाल प्राप्त होईल, अशी माहिती पांडुरंग फुंडकर यांनी दिली.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002