पर्यटकांनी गोव्यात यावे, पण घाण करू नये – मनोहर पर्रीकर
गोवा
2018-02-15
व्हीएस न्यूज - गोव्यात येणाऱ्या उत्तर भारतीय पर्यटकांबाबत कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविषयी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी प्रसारमाध्यमांसमोर स्पष्टीकरण दिले. त्यांनी यावेळी म्हटले की, पर्यटनासाठी गोव्यात भारतातील लोकांनी जरुर यावे. पण त्यांनी यावेळी काही गोष्टींचे भान बाळगणे गरजेचे असून रस्त्यावर पर्यटकांनी लघवी करू नये, कुठेही कचरा टाकू नये असे अपेक्षित
आहे. केवळ पर्यटकच नव्हे तर स्थानिकांनी देखील रस्त्यावर कचरा टाकू नये, असे अपेक्षित असतेच व आहे, असे पर्रीकर म्हणाले.मिरामार-दोनापॉल मार्गावर काही दिवसांपूर्वी एक पर्यटक बसमधून लघुशंका करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी यावरून उत्तर भारतीय पर्यटकांना धारेवर धरले होते. हे पर्यटक म्हणजे पृथ्वीवरची घाण असल्याचे त्यांनी म्हटले होते. सरदेसाई यांच्या या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. पर्रीकर यांनी या पार्श्वभूमीवर सरकारची भूमिका मांडली. पर्यटकांविषयी जे काही सरदेसाई यांना म्हणायचे होते, त्यामागील हेतू योग्य असावा. फक्त त्यांनी वापरलेली भाषा कठोर होती. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. पण त्याविषयी सरदेसाई यांनी स्वत:हून दिलगिरी व्यक्त केल्याचे पर्रीकर यांनी म्हटले.
तसेच ज्या साधनसुविधा सध्या गोव्यात आहेत, त्या पाहता पन्नास ते साठ लाख पर्यटकांचा भार गोवा पेलू शकतो. मात्र तिसरा मांडवी
पुल, नवा जुवारी पुल, पत्रदेवी ते पोळे महामार्ग अशा अनेक साधनसुविधा उभ्या राहिल्यानंतर दीड कोटी पर्यटकांना गोवा सामावून घेऊ
शकेल. पर्यटन व्यवसायाचा विस्तार व्हायला हवा. तो अंतर्गत भागांमध्ये विस्तारायला हवा. एका खनिज व्यवसायावर आम्ही अवलंबून
राहू शकत नाही आणि केवळ पर्यटनावरच सुद्धा अवलंबून राहू शकत नाही, असेही पर्रीकर यांनी सांगितले.