स्वच्छ भारत अभियानावर भाजप मंत्र्यानेच केली लघुशंका
नवी दिल्ली
2018-02-15
व्हीएस न्यूज – सध्या सोशल मीडियावर राजस्थान सरकारमधील भाजप मंत्री कालीचरण सराफ यांचा भररस्त्यात लघुशंका करताना फोटो व्हायरल झाला असून काँग्रेसने यावरुन सरकारवर टीका केली आहे. एकीकडे सरकार कोट्यवधी खर्चून स्वच्छ भारत अभियान राबवत आहे तर दुसरीकडे याचा पुरेपुर विसर सरकारच्या एका मंत्र्याला पडलेला दिसत आहे, कारण हे मंत्री महोदय पक्षाने राबवलेल्या या अभियानाचा विचार न करता चक्क रस्त्यावर लघुशंका करताना दिसत आहेत.
देशातील स्वच्छ शहरांच्या यादीत जयपुर शहर यावे यासाठी स्थानिक सरकार प्रयत्न करत आहे. राज्यातील नागरिकांनादेखील स्वच्छ भारत अभियान राबवून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आवाहन केले जात आहे. पण रस्त्यावर लघुशंका करून राज्याचे आरोग्य मंत्री सराफ यांनी सरकारच्या प्रयत्नांवर पाणी फेरले आहे. एकीकडे कोट्यवधी रुपये खर्च करून सरकार स्वच्छ भारत अभियान राबवत आहे तर दुसरीकडे या सरकारमधील मंत्रीच असे लज्जास्पद कृत्य करून समाजात चुकीचा संदेश देत असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. राजस्थानमध्ये रस्त्यावर लघुशंका करणाऱ्यांकडून २०० रुपयांचा दंड आकारला जातो. तेव्हा आरोग्य मंत्री सराफ यांच्याकडूनही दंड आकारणार का? असा सवाल काँग्रेसने केला आहे.