काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांची बेहिशेबी मालमत्ता प्रकरणातून सुटका
मुंबई
2018-02-15
व्हीएस न्यूज - काँग्रेसचे नेते आणि माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांना एसीबीच्या केसमधून मुक्त करण्यात आले आहे. कोणत्याही लोकनेत्या विरोधात खटला चालवण्यासाठी सक्षम प्राधिकरणाची परवानगी आवश्यक असते. मात्र या प्रकरणात ती घेण्यात आली नसल्याने कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात खटला चालवताच येणार नसल्याचे त्यांच्या वतीने एसीबी न्यायालयात सांगण्यात आले.
तसेच कृपाशंकर यांच्याविरोधात आरोपपत्रानुसार कोणतेही सबळ पुरावे सादर करण्यात तपास यंत्रणा अपयशी ठरली आहे. त्यामुळे कृपाशंकरसिंह यांना त्यांच्याविरोधात लाचलुचपत विभागामार्फत दाखल झालेल्या खटल्यातून दिलासा मिळालाय. कृपाशंकर सिंह आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधात आपल्या मिळकतीपेक्षा जास्त संपत्ती बाळगल्याच्या आरोपात एसीबीने गुन्हा दाखल केला होता.