व्हीएस न्यूज – इंडियन प्रीमयर लीग म्हणजेच आयपीएलच्या ११ व्या सिझनचे वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केले आहे. ७ एप्रिल २०१८ ला ५१ दिवस चालणाऱ्या टुर्नामेंटची सुरुवात होणार असून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरच पहिला आणि अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या टुर्नामेंटमधला अंतिम सामना २७ मे रोजी खेळवण्यात येईल.
सध्या चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन आणि दोनवेळा चॅम्पियन ठरलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज या दोन संघांदरम्यान पहिला सामना रंगणार आहे. पहिला सामनाच अत्यंत चुरशीचा ठरणार आहे यात शंकाच नाही. धोनी कर्णधार असलेली चेन्नई टीम दोन वर्षांनी पुन्हा मैदानावर असणार आहे. तर मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद रोहित शर्माकडे असणार आहे. आयपीएलच्या या मोसमातील १२ सामने हे संध्याकाळी ४ वाजता तर इतर ४८ सामने हे रात्री ८ वाजता खेळवले जाणार आहेत. हे सामने स्टार स्पोर्टस् या चॅनलवर क्रिकेट रसिक पाहू शकणार आहेत.