ओवेसींनी दहशतवादी असलेल्या मुस्लीमांचीही गणना करावी – स्वामी
नवी दिल्ली
2018-02-15
व्हीएस न्यूज – भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी शहीद झालेल्या भारतीय मुस्लीमांचा दाखला देणाऱ्या असदुद्दीन ओवेसींनी लष्करावर हल्ले करणारे दहशतवादी मुस्लीमही मोजावेत अशी बोचरी टीका केली आहे. पाच मुस्लीम जवानांचे काश्मिरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये प्राण गेले होते, परंतु कुणी त्यांची दखल घेतली नाही, त्याचबरोबर पंतप्रधानांनीही यावर ट्विट केले नाही असा सूर ओवेसी यांनी आळवला होता. या प्रकरणाचे राजकीयीकरण करू नये असे सांगताना लष्करात धर्माला स्थान नसते असेही ज्येष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी सुनावले होते. आता, ओवेसींवर स्वामी यांनी हल्ला चढवला असून त्यांनी शहीदांप्रमाणेच दहशतवादी असलेल्या मुस्लीमांचीही गणना करावी असा सल्ला स्वामींनी ओवेसींना दिला आहे.
स्वामींनी गुरुवारी सकाळी ट्विटच्या माध्यमातून आपले मत व्यक्त केले आहे. जैश ए महम्मद व लष्कर ए तय्यबाच्या दहशतवाद्यांनी संजुवन येथील लष्करी तळावर केलेल्या हल्ल्यात सहा जवान शहीद झाले होते, त्यातील पाच मुस्लीम होते असे ओवेसींनी लक्षात आणून दिले आणि नको तिथे धर्म काढला होता. त्यांच्यावर त्यावरून प्रचंड टीकाही झाली. देशाचे रक्षण करणे हा एकच धर्म सैनिकांचा असल्याचेही सांगितले गेले. लष्करामध्ये सैनिकांचा धर्म काढून राजकीय पोळ्या भाजू नयेत असे उत्तर कमांडचे लेफ्टनंट जनरल आनबू यांनीही सुनावले होते.