पंजाब नॅशनल बँकेला गंडा घालणारा नीरव मोदी देश सोडून पळाला?
मुंबई
2018-02-15
व्हीएस न्यूज – ११, ४०० कोटी रुपयांचा सार्वजनिक क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेला गंडा घालणारा अब्जाधीश हिरे व्यापारी नीरव मोदी देश सोडून पळाला असल्याचे वृत्त आहे. नीरव मोदीने कारवाई होईल हे दिसताच स्वित्झर्लंडमध्ये पळ काढल्याचे समजते. अद्याप मुंबई पोलिसांकडून या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही.
फसवणुकीच्याद्वारे बँकेच्या परदेशस्थ शाखांमधून नीरव मोदी व त्यांच्या कंपन्यांना कर्जउभारणीसाठी पंजाब नॅशनल बँकेच्या दोन कर्मचाऱ्यांनी बनावट हमीपत्रे जारी करवून घेतली. पण बँकेच्या यंत्रणेत त्याविषयी कोणतीच नोंद झाली नव्हती. बँकेने या संशयाच्या आधारेच कंपन्यांविरोधात पहिली तक्रार दिली होती. या घोटाळ्याची माहिती शेअर मार्केटला देणे बंधनकारक असल्याने बँकेने बुधवारी ही माहिती कळवली आणि या घोटाळ्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली.
हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याच्या काही कंपन्या तसेच अन्य नामांकित जवाहिरे कंपन्यांवर ११, ४०० कोटी रुपयांच्या या घोटाळ्यात संशय आहे. या घोटाळ्याप्रकरणी पंजाब नॅशनल बँकेकडून दोन तक्रारी दाखल झाल्या असून या प्रकरणाची सीबीआयने चौकशी सुरु केली आहे. दुसरीकडे या प्रकरणी नीरव मोदीविरोधात अंमलबजावणी संचालनालयानेही गुन्हा दाखल केला आहे.
बँकेने गेल्याच महिन्यात नीरव मोदीविरोधात २८० कोटी रुपयांच्या फसवणुकीसंदर्भात तक्रार दाखल केली होती. ईडीने याच प्रकरणात गुन्हा दाखल करत चौकशीला सुरुवात केली आहे. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने कारवाई होणार हे स्पष्ट होताच नीरव मोदी देशाबाहेर पळाल्याचे वृत्त दिले आहे. पण अद्याप सरकारी यंत्रणांकडून या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही.