व्हीएस न्यूज – भाजप नगरसेविका असलेल्या पत्नीने नवऱ्याला ‘व्हॅलेंटाईन डे’ला प्रेयसीसह रंगेहाथ पकडले. प्रेयसी आणि आपल्या पतीला नुसतेच पकडले नाही तर या नगरसेविका पत्नीने त्यांना चांगला चोपही दिला.
आपल्या पतीचे बाहेर प्रेमप्रकरण असल्याची कुणकुण नागपुरातील भाजपच्या एका नगरसेविकेला लागली होती. तिला प्रयत्न करुनही पुरावा मिळत नव्हता, म्हणून ती शांत होती. त्या नगरसेविकेच्या पतीला बुधवारी ‘व्हॅलेंटाईन डे’ला प्रेयसीचा फोन आला. दोघेही प्रेमदिवसानिमित्त भेटणार अशी दाट शक्यता नगरसेविकेला वाटतच होती आणि तसेच झाले. पती प्रेयसीला भेटायला निघाला असता त्याच्या मागावर पत्नीही निघाली.
छत्रपती चौकात पती आला, त्याची प्रेयसी तिथे आधीपासूनच वाट पाहत होती. प्रेयसीला पती गुलाबाचे फुल देणार तेवढ्यातच नगरसेविकेने त्यांना गाठले आणि दोघांना चांगलाच चोप दिला. यानंतर काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण होते. नगरसेविका पत्नीने चंडिकेचे रुप धारण केल्याने पतीचा‘व्हॅलेंटाईन डे’ उधळला गेला. पण कुणीही पोलिसात बदनामीच्या भीतीपोटी तक्रार दाखल केली नाही. पण नगरसेविकेच्या पतीच्या प्रेमलिलांची चर्चा काल अवघ्या परिसरात रंगली होती.