व्हीएस न्यूज - हिंदू धर्माला अधिकाधिक सुरक्षित करायचे असेल तर त्यांची संख्या वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकाने राष्ट्रहिताच्या भावनेने अधिकाधिक मुलांना जन्म द्यावा, असे वक्तव्य करुन साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी सोमवारी खळबळ उडवून दिली. मुलांना जन्माला घालण्यापूर्वी त्यांचे पालनपोषण कसे करावे, याची चिंता जर पालकांना असेल तर ती आमच्यावर सोडा. पाच वर्षांपर्यंत तुम्ही सांभाळा, नंतर त्यांचा सांभाळ आम्ही करू व राष्ट्रहितासाठी त्याला तयार करू. किंबहुना माझा जीवन संकल्पच राष्ट्रभक्त मुलांना निर्माण करणे हा आहे, असेही त्या म्हणाल्या.
सिडकोतील संत तुकाराम नाटय़गृहात शिवजयंती व राष्ट्रहित जनाधार विश्वस्त मंडळाचे कै. जनुभाई रानडे यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ‘भगवा रंग त्यागाचा’ या विषयावरील व्याख्यानात त्या सोमवारी बोलत होत्या. व्यासपीठावर विश्व हिंदू परिषदेचे नेते संजय बारगजे, वीरुपाक्ष शिवाचार्य स्वामी, नवनाथ महाराज आंधळे, अंबरीश महाराज, मंडळाचे अध्यक्ष शिवाजी शेरकर, राजीव जहागीरदार, विभाश्री दीदी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. त्याचा संदर्भ घेत प्रज्ञासिंह यांनी स्त्री शक्ती किती महत्त्वाची असून एखाद्या राष्ट्राची पुढील पिढी निर्माणासाठी तिचे योगदान अधोरेखित करणारी उदाहरणे देत राष्ट्रहितासाठी मुलांना जन्म देण्याबाबतचे विधान केले. पद्मावत चित्रपटात हजारो स्त्रियांनी प्राणाची आहुती दिल्याच्या प्रसंगाचा अर्थ सांगताना राणी पद्मावतीने स्त्रियांना आपले शील रक्षण करण्यासाठी अग्नित उडय़ा घेण्याचे आवाहन केले होते, असेही त्या म्हणाल्या.
हिंदू राष्ट्र म्हणून ओळख निर्माण करायची असेल तर संख्यात्मक वाढ झाली पाहिजे. भगवान ने मुँह दिया तो दाना भी देगा, एवढा ‘त्यांचा’ विश्वास असतो, आपण मात्र एक किंवा दोनचवर थांबतो आहोत,असे त्यांनी सांगितले. कमी संख्येच्या घरातील मुलांना घरात एकलकोंडेप्रमाणे राहावे लागत असून त्यातून अलिकडे आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेतले जात असल्याच्या घटना घडल्या जात आहेत.
मिशनरीज आणि मदरशांमध्ये धर्माभिमानी शिक्षण दिले जाते. त्यातून आमच्या संस्कारांना क्षीण केले जाते. अशा शिक्षणाची आम्हाला गरज नाही. ना आम्हाला मदर शिकवणारे शिक्षण पाहिजे ना मदरशांमधील, असे सांगत साध्वी प्रज्ञासिंह यांनी आपल्या शिक्षणामध्ये राष्ट्रहित जोपासणारी मूल्ये नाहीत, असे मत करून त्याविषयी खंत व्यक्त केली.
संघ ही राष्ट्रभक्ती रुजवणारी संघटना
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना डॉ. हेडगेवार यांनी कशी व का केली, याची माहिती देऊन साध्वींनी संघ म्हणजे राष्ट्रभक्ती भिनलेली संघटना असल्याचे सांगितले. संघ प्रचारकाचे काम शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतूनच सुरू असते, असेही त्या म्हणाल्या. पद्मावतसारख्या विषयावर चित्रपट बनवून व्यावसायिक हित पाहून भावनेशी खेळले जात असल्याचा आरोप केला.
काँग्रेसवर टीका….
आपल्याकडे भावनांचा केवळ आईच्या मृत्यूनंतर मुलाला थेट पंतप्रधान बनवले जाते तेव्हाच विचार केला जात असल्याचे सांगत राजीव गांधी यांचे उदाहरण म्हणून प्रज्ञासिंह यांनी नाव घेतले. आम्हाला भगवे आतंकवादी ठरवण्यामागे आंतरराष्ट्रीय स्तरावरील षड्यंत्र असल्याचाही आरोप त्यांनी केला. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यासाठी, अयोध्येत राम मंदिर निर्माणासाठी प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002