व्हीएस न्यूज - पुण्यातील स्पर्धात्मक रम्मी खेळाडू संघटनेने रम्मी खेळताना चार खेळाडूंची सक्ती करण्याच्या राज्य सरकारच्या नियमाला विरोध करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून २००३ मध्ये जारी केलेल्या राज्य सरकारच्या नियमाप्रमाणे एका टेबलवर फक्त चारच खेळाडूंना रम्मी खेळण्याची परवानगी आहे, कारण पत्यांमध्ये केवळ ५२ पान असतात, अशी माहिती मुख्य सरकारी वकिलांनी उच्च न्यायालयात दिली.
न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि न्यायमूर्ती राजेश केतकर यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. साधारणत: लोक दोन किंवा त्याहून अधिक पत्यांचे संच घेऊन रम्मी खेळणे पसंत करतात. मग केवळ चार खेळाडूंची सक्ती का? असा सवाल उच्च न्यायालयाने विचारत राज्य सरकारच्या या नियमालाही आव्हान देण्याचे निर्देश याचिकाकर्त्यांना दिले होते. उच्च न्यायालयात त्यानुसार दाखल याचिकेवर १३ मार्चला होणाऱ्या सुनावणीत राज्य सरकाराला उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
रम्मी हा कौशल्याचा खेळ असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालात स्पष्ट करण्यात आले आहे. पुण्यातील स्पर्धात्मक रम्मी खेळाडू संघटनेकडून गेल्या १० वर्षांपासून याच रम्मीला स्पर्धात्मक रूप देण्याचा प्रयत्न सुरू आहे. साल २००४ साली स्थापन झालेल्या या संघटनेचे अध्यक्ष मिलिंद लिमये यांनी पुण्यात एक कार्ड कॅफे बार सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडे परवानगीसाठी अर्ज केला होता. पण ही परवानगी गृहविभागाकडून नाकारण्यात आली. लिमये यांनी ज्याला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. गृहविभागाने पुण्यातील या ‘कार्ड कॅफे बार’ला परवानगी नाकारताना खेळासाठी,जागेसाठी आणि खेळाच्या तिकीट विक्रीसाठी परवानगी नाकारताना अश्या प्रकारच्या स्पर्धेसाठी कोणतीही नियमावली अस्तित्त्वात नसल्याचे सांगितले आहे. लियमे यांच्या संकल्पनेनुसार त्यांना राज्यभरात रम्मीला एक स्पर्धात्मक रूप मिळवून द्यायचे आहे. ज्यात एकावेळी एका टेबलावर ५ ते ६ लोक रम्मी खेळतील. यात जुगाराप्रमाणे कॉईन्स न देता पॉईंट्स टेबल पद्धतीने विजेता ठरवला जाईल. ३ तासांची मर्यादा असलेल्या राऊंड सिस्टिमनुसार केवळ १३ पत्यांची रम्मी न खेळवता २१ आणि २७ पत्यांची रम्मीदेखील खेळवली जाईल.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002