व्हिएस न्यूज – लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी आसाममधील राजकीय पक्षाबाबत केलेल्या विधानाचे पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटू लागले असून ओवेसी यांनी रावत यांच्यावर राजकीय पक्षांवर भाष्य करणे हे लष्कर प्रमुखांचे काम नसल्याचे म्हणत निशाणा साधला आहे.
लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी सोमवारी दिल्लीतील एका कार्यक्रमात आसाममधील बद्रुद्दीन अजमल यांच्या ऑल इंडिया डेमोक्रॅटिक फ्रंट (एआययूडीएफ) पक्षाबाबत भाष्य केले होते. आसामसारख्या राज्यात बेकायदा मुस्लीम निर्वासितांमुळेच एआययूडीएफसारख्या पक्षाची वाढ झाली. भाजपपेक्षाही जास्त वेगाने या पक्षाची वाढ होत असल्याचे त्यांनी म्हटले होते. चीन व पाकिस्तान या देशांचा मुस्लीम निर्वासितांच्या घुसखोरीमागे हात असून या क्षेत्रातही अशांतता निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी म्हटले होते. ओवेसी यांनी रावत यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली. राजकीय विधाने लष्करप्रमुखांनी का करावे, राजकीय पक्षाची स्थापना करणे आणि तो वाढवण्याची मुभा लोकशाहीत असल्याचे त्यांनी सांगितले. राजकीय विषयांमध्ये लष्करप्रमुखांनी हस्तक्षेप करु नये. एखाद्या पक्षाच्या वाढीवर भाष्य करणे हे लष्करप्रमुखाचे काम नाही. राजकीय पक्षांना लोकशाहीने व देशाच्या संविधानाने स्वातंत्र्य दिले आहे. नेहमीच देशातील जनतेने निवडून आलेल्या नेतृत्वाखालीच लष्कराने काम केले पाहिजे, असे ओवेसींनी म्हटले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002