व्हीएस न्यूज – इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस अधिकारी संघटनेने माहिती व प्रसारण मंत्रालयातर्फे करण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणातील बदल्यांविषयी संताप व्यक्त करत या विषयात पंतप्रधानांनी लक्ष घालण्याची मागणी केली आहे. या बदल्या जबरदस्ती लादलेली धोरणे व सूचनांना विरोध केल्यामुळे करण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे. संघटनेने पंतप्रधानांच्या सचिवांच्या नावे लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, की मोठ्या प्रमाणात मंत्रालयाने केलेल्या बदल्यांमुळे मागील दोन महिन्यात एक चतुर्थांश (एकूण ५०० ग्रुप ए अधिकाऱ्यांपैकी १४० च्या जवळपास) अधिकारी प्रभावित झाले आहेत.
चालू व्यवहार, परंपरा, प्रशासकीय प्रक्रिया, न्यायालयाचे नियम आणि कार्मचारी व प्रशिक्षण विभागाच्या धोरणांना अनुसरून अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणातील बदल्या नाहीत, असा आरोप संघटनेचे अध्यक्ष अनिंद्य सेनगुप्ता यांनी पत्रात केला आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना याविषयी प्रतिक्रिया मागितली असता, त्यांनी कुठलेही विधान करण्यास नकार दिला. माहिती व प्रसारण मंत्रालय तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या कार्यालयांमध्ये काम करताना स्थानिक भाषेचे ज्ञान अत्यावश्यक आहे, ही बाब माहीत असूनही या बदल्यांद्वारे अधिकाऱ्यांना स्थानिक भाषेचे ज्ञान नसलेल्या ठिकाणी पाठवण्यात आले असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002