व्हीएस न्यूज - तीन वर्षीय अनाथ भारतीय मुलीला दत्तक घेतल्यानंतर तिची अमेरिकेत पालक पित्याकडून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत कसून चौकशी आदेश परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी महिला व बालविकास मंत्रालयाला दिले आहेत. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, आता यापुढे परदेशातील नागरिकांनी भारतातून दत्तक घेतलेल्या मुलांचे पासपोर्ट हे महिला व बालविकास मंत्रालयाच्या मंजुरीनंतरच दिले जातील, असे परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. अमेरिकेतील टेक्सास येथे भारतातून दत्तक घेतलेल्या शेरिन मॅथ्यूज या तीन वर्षाच्या मुलीची हत्या झाल्याचे उघड झाले आहे.
शेरिनला तिच्या अमेरिकन पालकांनी बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील ‘मदर तेरेसा अनाथ सेवा आश्रमा’तून दत्तक घेतले होते. दत्तक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिच्या या अमेरिकन पालकांनी तिला अमेरिकेतील टेक्सास येथे आपल्या घरी नेले. दरम्यान, ७ ऑक्टोबर रोजी शेरिन डल्लास येथून बेपत्ता झाल्याची तक्रार तिचा पालक पिता वेस्ली मॅथ्यूज याने पोलिसांत दिली होती. सुरुवातीला वेस्ली याने पोलिसांना तक्रार देताना सांगितले होते की, झोपण्यापूर्वी दूध प्यायला नकार दिल्याने त्याने शेरिनला रात्री ३ वाजता घराबाहेर उभे राहण्याची शिक्षा दिली होती. त्यानंतर त्यांच्या घरापासून जवळच शेरिनचा मृतदेह आढळून आला होता.
मात्र, त्यानंतर वेस्ली मॅथ्यूजने पोलिसांना वेगळीच कथा ऐकवली. शेरिनचा मृतदेह मला आमच्या गॅरेजमध्ये सापडला असे त्याने पोलिसांना सांगितले. मात्र, त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात शेरिनच्या शरीरावर मारहाण केल्याच्या खुणा आढळून आल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी वेस्लीला मुलीला गंभीर दूखापत केल्याप्रकरणी अटक केली होती. यावरुन शेरिनला मारहाण केल्यानेच तिचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले. त्यानंतर ही बाब भारत सरकारच्या निदर्शनास आल्यानंतर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत शेरिनच्या दत्तकत्वाची कसून चौकशी करण्याचे आदेश महिला व बालविकास मंत्रालयाला दिले आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002