व्हीएस न्यूज - जमिनीच्या वादातून शिवसेना महिला आघाडीच्या पिंपरी विधानसभा संघटकाला चार जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देत सिमेंटचा गट्टू फेकून मारला. ही घटना बोपखेल येथे घडली.
मंगला सदाशिव घुले (वय 43, रा. मारूती मंदीराजवळ, बोपखेल) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ऋषभ ज्ञानेश्वर घुले (वय 20), सविता पांडुरंग घुले (वय 41), पांडुरंग घुले (वय 45), मंदार ज्ञानेश्वर घुले (वय 19, सर्व रा. बोपखेल) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगला घुले या शिवसेना महिला आघाडीच्या पिंपरी विधानसभा संघटक आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमिनीच्या वादातून मंगला घुले यांनी 2008 साली न्यायालयात दावा दाखल केला आहे. मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घुले या घरासमोर थांबल्या होत्या. यावेळी आरोपींनी मंगला घुले यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण सुरू केली. ऋषभ याने त्यांना 'तु केस मागे घे, अन्यथा तुला खलास करून टाकू', अशी धमकी दिली. तसेच सिमेंटचा गट्टू मंगला घुले यांना फेकून मारला.
फौजदार प्रमोद कठोरे अधिक तपास करत आहेत.