व्हीएस न्यूज - रेल्वेकडून लवकरच आरक्षण अर्जावर तृतीयपंथीयांना स्वतंत्र पर्याय दिला जाणार आहे. सध्या रेल्वे तिकिटासाठी आरक्षण अर्ज भरताना त्यावर पुरुष आणि महिला असे दोन पर्याय सध्या उपलब्ध आहेत. मात्र आता तिकीट आरक्षित करताना आणि ते रद्द करताना भरावा लागणाऱ्या अर्जात तृतीयपंथीयांसाठी वेगळा पर्याय दिला जाणार आहे. याबद्दलची सूचना रेल्वे बोर्डाकडून सर्व विभागांना देण्यात आली आहे.
‘तिकीट अर्जात पुरुष आणि महिला यांच्यासाठी अनुक्रमे एम आणि एफ असे दोन पर्याय देण्यात येतात. मात्र आता त्यामध्ये तृतीयपंथीयांसाठी टी हा पर्याय द्यावा,’ अशी सूचना रेल्वेकडून देण्यात आली आहे. रेल्व बोर्डाने सर्व विभागांना लिहिलेल्या पत्रात सामाजिक न्याय मंत्रालयाकडून तृतीयपंथीयांसाठी घेण्यात आलेल्या विविध निर्णयांचा उल्लेख आहे. तृतीयपंथीय हक्क संरक्षण विधेयक २०१६ चा संदर्भही या पत्रात आहे. संसदेच्या स्थायी समितीकडून सध्या तृतीयपंथीय हक्क संरक्षण विधेयकाचा आढावा घेतला जात आहे. ‘सामाजिक न्याय मंत्रालयाकडून याबद्दलची सूचना येण्यापूर्वी तिकीट अर्जावर तृतीयपंथींयांसाठी ‘टी’ हा पर्याय देण्यात यावा,’ असे रेल्वे बोर्डाने सर्व विभागांना १७ ऑक्टोबर रोजी लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. रेल्वेच्या सर्व विभागांनी या सूचनेचे पालन करावे, अशी ताकीदही पत्रातून देण्यात आली आहे.
२०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने तृतीयपंथीयांना दिलासा देणारा निकाल दिला. या निर्णयामुळे महिला आणि पुरुषांसोबतच तृतीयपंथीयांना न्यायालयाने मान्यता दिली. याआधी तृतीयपंथीयांना कोणताही अर्ज भरताना महिला आणि पुरुष यापैकी एक पर्याय निवडावा लागायचा. मात्र न्यायालयाच्या निर्णयानंतर पासपोर्ट, शिधावाटप पत्रिका, बँकांचे अर्ज, मतदार ओळखपत्र यांच्यासह अनेक ओळखपत्रकांवर तृतीयपंथीयांना पर्याय दिला जाऊ लागला.
रेल्वेने २०१६ मध्ये तिकीट अर्जात टी (एम/एफ) असा पर्याय दिला होता. मात्र यामुळे तृतीयपंथीयांचे स्वतंत्र अस्तित्व नाकारले जात असून त्यांना महिला किंवा पुरुष यापैकी एका पर्यायावर बरोबरची खूण करावी लागते, असा आक्षेप सामाजिक संघटनांनी घेतला. त्यामुळे आता रेल्वेकडून तृतीयपंथीयांना वेगळा कॉलम दिला जाणार आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002