व्हीएस न्यूज – - नारायण राणे यांनी मुलांच्या भविष्यासाठी काँग्रेस पक्ष सोडला असे खळबळजनक विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. डॉ. पतंगराव कदम यांनी केले. तसेच राष्ट्रवादीला काँग्रेसशिवाय पर्याय नाही, असे सूचक विधान आ. कदम यांनी केले. ते पंढरपूरमध्ये बोलत होते.
माजी मंत्री आ. डॉ. पतंगराव कदम हे रविवारी एका खासगी कार्यक्रमानिमित्त पंढरपूरला आले होते. येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी ते बोलत होते. या वेळी काँग्रेसचे कल्याण काळे, शहराध्यक्ष अॅड. राजेश भादुले आदी उपस्थित होते. आ. कदम यांना राणे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी राणे यांना लक्ष्य केले. राणे आमदार, मंत्री, मुख्यमंत्री झाले तरीही सत्तेचा मोह काही सुटला नाही. मुलांच्या भविष्यासाठी राणे यांनी काँग्रेस पक्ष सोडला, असे खळबळजनक विधान कदम यांनी केले. चांगले काम केले तर बाजारात किंमत मिळते. नाहीतर कुत्रेदेखील विचारत नाही, असा टोला लगावत एकदाच मंत्री व्हावे, आयुष्यभर मंत्रिपदाची इच्छा बाळगणे योग्य नाही, असे कदम म्हणाले.
कॉंग्रेस पक्ष आक्रोश मेळावे घेत आहे. राष्ट्रवादीला सोबत का घेतले नाही असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केल्यावर कदम यांनी सूचक विधान केले. राष्ट्रवादी आणि काँग्रेस वेगळे नाही. पवार साहेब हे काँग्रेसच्या मुशीत तयार झाले आहेत. विधानसभा निवडणुका एकत्र लढलो असतो तर सत्ता गेली नसती. राष्ट्रवादीला काँग्रेसशिवाय पर्याय नाही असे विधान कदम यांनी केले. मुंबईतील फेरीवाले यांच्याबाबत सरकारने ठोस निर्णय घ्यावा, असा सल्ला कदम यांनी दिला. सरकारला जाहिरातीवर खर्च करायला पसे आहेत, मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला पसे नाही, अशी टीका कदम यांनी केली.
मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक…
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे व्यक्तिगत चांगले आहेत. त्यांचे विचार सकारात्मक आहेत. त्यांची काम करण्याची ऊर्जा आहे, असे तोंडभरून मुख्यमंत्र्यांचे कौतुक माजी मंत्री आ. पतंगराव कदम यांनी केले, मात्र त्यांनी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी होत नाही. मंत्रिमंडळातील टीम मात्र चांगली नाही, त्यामुळे सरकारची अडचण होत आहे, असे मत कदम यांनी व्यक्त केले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002