व्हीएस न्यूज - पृथ्वीवरील वाढती लोकसंख्या आणि ऊर्जेचा मोठ्या प्रमाणावरील वापरामुळे २६०० सालापर्यंत पृथ्वी आगीचा गोळा होईल, अशी भीती जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी व्यक्त केली. पृथ्वीवर मानवजातीचे अस्तित्व टिकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. बीजिंगमधील टेंसेंट वी या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये हॉकिंग पृथ्वी ग्रहाच्या भविष्याबद्दल बोलत होते.
‘जगाची लोकसंख्या झपाट्याने वाढते आहे. त्यामुळे आपण या वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची निर्मिती करत आहोत. या अती ऊर्जा निर्मितीमुळे पृथ्वीचे तापमान वाढते आहे. याचा मोठा फटका भविष्यात मानवजातीला बसणार आहे,’ असे मत हॉकिंग यांनी व्यक्त केले. पृथ्वीचे बदलणारे तापमान आणि या तापमान बदलाचा पृथ्वीच्या वातावरणावर होणारा परिणाम याबाबत गंभीर विचार करणे ही काळाची गरज आहे. सर्वांनी यासंदर्भात एकत्रितपणे विचार केला तरच या संकटाचा सामना करता येईल, असे हॉकिंग यांनी म्हटले आहे. याआधीही अनेकदा हॉकिंग यांनी पृथ्वीवरील वाढते प्रदूषण आणि त्याचा मानवजातीच्या अस्तित्वाला असणाऱ्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. माणसाला आपले अस्तित्व टिकवण्यासाठी वस्ती करण्यायोग्य ग्रहाचा शोध आत्तापासूनच घ्यावा लागेल, असे हॉकिंग यापूर्वी म्हणाले होते.
हॉकिंग यांनी यावेळी ब्रेकथ्रू स्टारशॉट संकल्पनेचे समर्थनही या वेळी केले. ब्रेकथ्रू स्टारशॉट या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत प्रकाशाच्या वेगाने प्रवास करणारी अंतराळयाने तयार करण्याच्या शक्यतांवर विचार केला जात आहे. अशी अंतराळयाने विकसित झाल्यास पृथ्वीवरून मंगळावर पोहोचण्यासाठी फक्त एक तासाचा प्रवास करावा लागेल, असेही हॉकिंग यांनी सांगितले. तर सौरमालेच्या काठावर असणाऱ्या प्लुटोपर्यंत पोहोचण्यासाठी २४ तास लागतील. मात्र इतके वेगवान यान तयार करुनही पृथ्वीप्रमाणे जीवसृष्टी असण्याची शक्यता असणाऱ्या आपल्या सौरमालेपासून जवळच्या अल्फा सेंच्युरी या तारकासमुहापर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल वीस वर्षे लागतील, अशी माहिती हॉकिंग यांनी दिली.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002