व्हीएस न्यूज - पायल नृत्यालयाच्या वतीने अभिव्यक्ती हा कथ्थक नृत्याचा कार्यक्रम चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात नुकताच पार पडला. जगप्रसिद्ध नृत्यांगना पंडिता मनिषा साठे यांच्या ज्येष्ठ शिष्या पायल गोखले आणि त्यांच्या विद्यार्थिनींनी हा अभिव्यक्ती कार्यक्रम सादर केला.
कार्यक्रमासाठी गुरु पंडिता मनिषा साठे, गुरु पं. नंदकिशोर कपोते, प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत निगुडकर उपस्थित होते. यावेळी मनिषा साठे म्हणाल्या की, कोणतीही कला आत्मसात करण्यासाठी सातत्य, कष्ट, रियाज यांची जोड आवश्यक असते. आपल्या गुरुंच्या मार्गदर्शनाखाली कला बहरत जाते. पिंपरी-चिंचवड शहरात कथ्थकचे मार्गदर्शन करत असल्याबद्दल त्यांनी आपल्या शिष्या पायल गोखले यांचे विशेष कौतुक केले.
भारतीय संगीत आणि नृत्य नव्या पिढीपर्यंत पोहचविणे आणि आपल्या समृद्ध कलासंस्कृतीचा प्रचार-प्रसार या क्षेत्रातील लोक मनापासून करत आहेत. पाश्चात्य नृत्य आणि संगीताच्या काळात देखील भारतीय नृत्य आणि संगीत आपली एक वेगळी ओळख टिकवून असल्याचे आणि अजूनही नागरिकांच्या मनात भारतीय नृत्य-संगीताबद्दल आदर व प्रेम असल्याचेही या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिसून आले. या कार्यक्रमासाठी रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येक चांगल्या कलाकृतीस टाळ्यांच्या कडकडाटाने भरभरुन दाद देत होते.
विशेष कलाकृतीने कार्यक्रमास बहार…
कथ्थक नृत्याविष्काराने परिपूर्ण असलेल्या या कार्यक्रमात कथ्थकचे विविध रंग पाहायला मिळाले. सरस्वती वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर गुरु पायल गोखले यांनी झपताल सादर करुन प्रेक्षकांची दाद भरभरुन दाद मिळवली. तर अभंग, तराणा, तालप्रस्तुती, होरी, शिवस्तुती, ठुमरी यांनी कार्यक्रमाला विशेष बहार आणली. सतारवर केलेल्या कथ्थकनृत्याला उपस्थितांनी भरभरुन दाद दिली. यावेळी गुरु मनिषा साठे यांनी शिकवलेल्या रचना पायल गोखले यांनी पेश केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिनल उंब्राणी यांनी केले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002