व्हीएस न्यूज - बँक खाते आणि मोबाइल नंबर आधार कार्डशी जोडण्यावरून निर्माण झालेला वाद शमलेला नसतानाच आता विमाधारकांना त्यांच्या विमा पॉलिसी आधारशी जोडणे सक्तीचे करण्यात येणार असल्याचे वृत्त येत आहे.‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीएआय) सर्व विमा कंपन्यांच्या ग्राहकांच्या पॉलिसी आधार आणि पॅन क्रमांकाशी जोडण्याचे निर्देश जारी केले आहेत. नुकताच सर्वोच्च न्यायालयाने बँका आणि मोबाइल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना आधार क्रमांक जोडण्याबाबत लोकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या अफवा पसरवण्यावरून फटकारले होते. आधार कार्डशी निगडीत एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयातील खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने बँका आणि मोबाइल कंपन्यांना ग्राहकांना आधार क्रमांकाशी जोडण्याबाबत अंतिम तारखेबाबत सातत्याने सूचना देण्यास सांगितले आहे.
या वृत्तानुसार, या आदेशानंतर जो पॉलिसी धारक आपल्या पॉलिसीशी आधार आणि पॅन कार्ड जोडणार नाही त्याला त्या विम्याची रक्कम मिळणार नाही. आयआरडीएने १ जून २०१७ च्या राजपत्रातील अधिसूचनेनुसार विमा कंपन्यासह सर्व आर्थिक सेवा प्रदात्यांना ग्राहकांचे आधार आणि पॅन कार्ड/ फॉर्म ६० जोडण्यास सांगितले आहे. आयआरडीएचे (जीवन विमा) अधिकारी नीलेश साठे यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला सांगितले की, जीवन विम्याशी निगडीत पॉलिसींनाही आधार आणि पॅनबरोबर जोडावे लागेल. अनेक विमा कंपन्या वार्षिक ५० हजारहून अधिक हप्ता देणाऱ्या ग्राहकांकडून यापूर्वीच पॅन क्रमांक घेऊन पैसे घेत आहेत.
विमा धारक संबंधित कंपन्यांच्या कार्यालयात जाऊन किंवा मोबाइल संदेश किंवा ऑनलाइन आपले आधार आणि पॅन कार्ड जोडू शकतात. देशभरात सुमारे २९ कोटी लोकांनी जीवन विमा उतरवला आहे. तर २१ कोटी वाहन धारकांकडे विमा आहे. आरोग्य विमा धारकांची संख्याही मोठ्याप्रमाणात आहे. गेल्यावर्षी सुमारे अडीच कोटी लोकांनी जीवन विमा उतरवला होता. यामध्ये २.०५ कोटी लोकांनी भारतीय जीवन विमा निगमचे (एलआयसी) ग्राहक होते. देशात सुमारे ५४ विमा कंपन्या आहेत. देशात सार्वजनिक क्षेत्रात चार सामान्य विमा, एक जीवन विमा आणि एक पुर्नविमा कंपनी कार्यरत आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002