व्हीएस न्यूज - लष्कराकडून लाईट कॉम्बॅट विमान तेजस आणि अर्जुन रणगाड्याची निर्मिती थांबवण्याची तयारी सुरु आहे. तेजस आणि अर्जुनच्या सुधारित श्रेणीची निर्मिती थांबवण्याबद्दलचा प्रस्ताव लष्कराकडून देण्यात आला आहे. मेक इन इंडिया आणि सामरिक भागीदारीच्या धोरणांतर्गत परदेशी कंपन्यांकडून सिंगल इंजिन फायटर जेट्स आणि रणगाडे खरेदी करण्याचा प्रस्ताव लष्कराकडून देण्यात आला आहे.
गेल्याच आठवड्यात लष्कराने १,७७० रणगाड्यांसाठी प्राथमिक स्तरावरील निविदा मागवली आहे. या रणगाड्यांना फ्युचर रेडी कॉम्बॅट व्हेईकल्सदेखील म्हटले जाते. युद्धजन्य परिस्थितीत शत्रू सैन्यावर वरचढ ठरण्यासाठी या रणगाड्यांचा उपयोग होऊ शकतो. यासोबतच भारतीय हवाई दलाकडून लवकरच ११४ सिंगल फायटर जेट्स विमानांसाठी निविदा मागवल्या जाऊ शकतात. संरक्षण क्षेत्रातील अनुभवाची कमतरता दूर करण्यासाठी सामरिक भागिदारीवर जोर दिला जात आहे. त्याच अनुषंगाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. नव्या धोरणांतर्गत शस्त्रास्त्रांचे उत्पादन करणाऱ्या भारतातील खासगी कंपन्या आणि जगातील मातब्बर कंपन्या संयुक्तपणे उत्पादन करतील. यामध्ये तंत्रज्ञानाचे हस्तांतरणदेखील केले जाईल.
‘मेक इन इंडिया’ला गती देण्यासाठी केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे भारतीय संरक्षण दलांना अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि युद्ध सामग्री मिळेल. मात्र भारतीय सुरक्षा दलांसाठी करण्यात येणारी आर्थिक तरतूद अतिशय कमी आहे. त्याचा परिणाम संरक्षण दलांच्या शस्त्रसज्जतेवर होऊ शकतो. याशिवाय संरक्षण दलांसाठी केल्या जाणाऱ्या आर्थिक तरतुदींमधील बराचसा हिस्सा आधी करण्यात आलेले करार पूर्ण करण्यासाठीच वापरला जाईल. त्यामुळे नवे करार करण्यावर अनेक मर्यादा येतील. भारतीय हवाई दलाच्या एकट्या सिंगल इंजिन फायटर प्रकल्पावरच संरक्षण मंत्रालयाला जवळपास १.१५ लाख कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत.
याशिवाय डीआरडीओकडूनही दबाव टाकण्यात येत आहे. सिंगल इंजिन फायटर जेट्सच्या प्रकल्पासाठी सरकारला अनेक प्रश्नांचा सामना करावा लागत आहे. ‘मोठमोठे सुरक्षा प्रकल्प खासगी क्षेत्रातील कंपन्यांना देण्यात येणे कितपत योग्य आहे, असे प्रश्न विचारले जात आहेत,’ अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर आमच्याकडून उत्तम दर्जाच्या सिंगल इंजिन फायटर जेट्सची निर्मिती केली जाऊ शकते, असे हिंदुस्तान ऍरॉनॉटिक्सने म्हटले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002